मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवशी मध्यरात्री फुटपाथवर झोपणाऱ्या आई-वडिलांसोबत असलेल्या एका अडीच महिन्याच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. घाबरलेल्या आई-बापाने आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या हरवण्याची माहिती दिली. त्यानंतर आईन दिवाळीत घटनेचे गांभीर्य पाहता मुंबई पोलिसांनी तातडीने ८ पोलीस पथक या चिमुकलीच्या शोधासाठी पाठवली.
सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांच्या मदतीने काही वेळातच या चिमुकलीचा शोध घेऊन स्वतः मुंबई पोलीस कमिशनर विवेक फणसळकर यांनी या बाळाचा ताबा आई-वडिलांकडे दिला.
मध्यरात्री या आरोपीने आई-वडिलांजवळ झोपलेल्या या बाळाचे अपहरण केले. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती मीरा-भाईंदर परिसरामध्ये कीटकनाशक विक्रीचे काम करत होता. सध्या तो त्याच्या पत्नीसोबत राहतो. त्यांनी असे पाऊल का उचलले याचा अधिक तपास आम्ही करत आहोत, असे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्याचबरोबर पालकांनी आपल्या लहान मुलांकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी केले आहे .
दरम्यान दिवाळीमध्ये मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून या लक्ष्मीला पुन्हा तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्त केले आहे. मुलीला सुरक्षित असलेले पाहिल्यानंतर आई-वडिलांना देखील अश्रू अनावर झाले.
Comments are closed.