अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे तात्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन

233 0

पुणे : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी विमासंरक्षीत पिकाच्या गारपीट, अवेळी पाऊस, ढगफुटी आदी नैसर्गिक कारणाने झालेल्या नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह आपल्या संबंधित विमा कंपनीकडे सादर करावी, असे आवाहन कृषी उपसंचालक अरुण कांबळे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आदी घटनांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या स्वरुपानुसार विहित रक्कम शेतकऱ्यांना देय असते. नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत माहिती द्यावी.

नुकसानीबाबतची माहिती शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या पर्यायांचा वापर करता येईल, असेही आयुक्तालयाने कळवले आहे.

Share This News
error: Content is protected !!