ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

229 0

पुणे : जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. स्वारगेट येथे जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने ‘भेटूया दिग्गजांना’ या पुस्तकाच्या प्रकाशन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. के. एच.संचेती, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जनसेवाचे अध्यक्ष विनोद शहा, खजिनदार राजेश शहा, मीना शहा, जे.पी.देसाई उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रात पुण्याचे देशात नाव आहे. प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण असलेल्या महानगरात जेष्ठ नागरिकांसाठी जनसेवा फाऊंडेशन सेवाभावाने काम करत आहे. जेष्ठांची सेवा हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून संस्था यापुढील काळातही ते सुरू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भेटूया दिग्गजांना’ या पुस्तकांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तब्बल १९ दिग्गजांचा जीवन प्रवास मांडण्यात आला आहे. समाजासाठी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून चांगले विचार मिळतात असेही श्री. कोश्यारी म्हणाले. डॉ. संचेती म्हणाले, जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवेचे अखंड कार्य सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तसेच आवश्यक सेवा देण्यात संस्थेने केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

श्री. कराड म्हणाले, भारताने जगाला शांतीचा संदेश दिला आहे. त्याग आणि समर्पण याचे उदाहरण म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे. जनसेवा फाऊंडेशन असेच जनसेवेचे कार्य करते आहे.प्रास्ताविकात श्री. शहा यांनी संस्थेची माहिती दिली. यावेळी श्री. जे. पी. देसाई लिखित ‘भेटूया दिग्गजांना’ पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!