खाते सुरू करण्यापासून ते प्राप्तीकर विवरण भरण्यापर्यंत पॅनकार्ड एक अधिकृत कागदपत्र आणि केवायसी म्हणून काम करते. शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील किंवा सोने खरेदी करायचे असेल किंवा एखाद्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर पॅनकार्डची मागणी केली जाते.
आधार कार्ड अस्तित्वात येऊनही पॅनकार्ड महत्व कायम राहिले आहे. म्हणूनच आधार नंबरला पॅन जोडणे बंधनकारक करण्यात आले. या नंबरमुळे कार्डधारकाची फायनान्शियल हिस्ट्री तपासता येणे शक्य झाले. पण पॅनकार्डची मुदत कधी संपू शकते का ? पॅनकार्ड किती दिवस वैध कागदपत्र म्हणून काम करू शकते? असे प्रश्न स्वाभाविकपणे येऊ शकतात. आपणही पॅनकार्डच्या व्हॅलिडिटीवर लक्ष दिले नसेल तर त्याची मुदत जाणून घेऊ या. पॅनकार्ड कोण जारी करते आणि कसे तयार होते, हे समजून घेऊ.
कार्ड कसे तयार करावे ? : पॅनकार्ड घरबसल्या देखील ऑनलाइनवर तयार करता येऊ शकते. सर्वप्रथम आपल्याला ई फायलिंग पोर्टलवर जावून ‘इन्स्टंट पॅन थ्रो आधार’ वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर गेट न्यू पॅनची निवड करावी लागेल. यानंतर आधार क्रमांक विचारला जाईल. आधार नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर त्याचा ओटीपी येईल. ओटीपी व्हॅलिडेशननंतर ई-पॅन जारी केले जाईल. आपण फीजिकल कार्ड देखील मागवू शकता.
पॅनकार्ड कोण जारी करते : पॅन कार्डला एनएसडीएल (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) जारी करते. पॅनकार्डच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात असल्याने त्याला लीगल डॉक्यूमेंटही म्हटले जाते. करचुकवेगिरी रोखण्यासाठी देखील पॅनकार्डचा वापर होतो. तरीही त्याची वैधता किती दिवसपर्यंत राहाते, याची माहिती असणे गरजेचे.
लाइफटाइम व्हॅलिडिटीसह पॅनकार्ड : पॅनकार्डची व्हॅलिडीटी ही आयुष्यभर राहते. व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याचे पॅनकार्ड रद्द होते किंवा मृत्युप्रमाणपत्राच्या आधारे महत्त्वाच्या ठिकाणी केवायसी अपडेट करून संबंधित व्यक्तीचे पॅनकार्ड रद्द करता येऊ शकते. पॅनकार्डची एक्सपायरी ही कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतरच होते. पॅनकार्डमधील दहा अंकी आकडे हे अल्फान्यूमेरिक क्रमांक असतात. पॅनकार्डमध्ये संबंधित व्यक्तीची माहिती असते. कायदेशीररित्या एक व्यक्ती एकच पॅनकार्ड बाळगू शकतो. एकापेक्षा अधिक पॅनकार्ड असल्यास दंड आकारला जातो.
एकापेक्षा अधिक पॅन बेकायदा : प्राप्तीकर खात्याच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पॅन असेल आणि त्याचा तो वापर करत असेल तर ही कृती बेकायदा मानली जाईल. त्याच्याविरुद्ध कारवाई देखील होऊ शकते. प्राप्तीकर कायदा कलम 1961 च्या 272 बी नुसार एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड असल्यास दहा हजाराचा दंड आकारला जाऊ शकतो. आपल्याकडेही एकापेक्षा अधिक पॅनकार्ड असेल तर एक कार्ड जमा करू शकतो. पॅनकार्डला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे सरेंडर करता येते.