उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सव आणि ‘चेतना’ केंद्राचे उद्धाटन

279 0

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित युवा महोत्सव २०२२ आणि विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या ‘चेतना’ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.उज्वला चक्रदेव, ‘चेतना’ केंद्राच्या प्रमुख डॉ.नलिनी पाटील, समन्वयक डॉ.शितल मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख नितीन प्रभू तेंडुलकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, माणसाला शारीरिक आणि मानसिक गरजा असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणाला संधी देण्यासोबत त्यांच्या सादरीकरणाविषयी त्याला दाद मिळविता यावी यासाठी युवा महोत्सवाची आवश्यकता आहे. एसएनडीटी विद्यापीठ कलेच्या साधनेसाठी प्रसिद्ध आहे. परदेशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपले संगीत आणि योग याविषयी आकर्षण आहे. त्यांना आपल्याकडे आणण्यासाठी विद्यापीठाला परिश्रम घ्यावे लागतील.

कोविड काळात शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अल्प कालावधीचा जोड अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना विद्यापीठांना करण्यात आली आहे. यामुळे उद्योगजगतात शैक्षणिक पात्रतेबाबत विश्वास निर्माण होईल.

आज परंपरागत शिक्षणाने देशातील जनतेला रोजगार देता येणे शक्य नाही. कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना देश-विदेशात मागणी आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने ‘चेतना’ केंद्राची महत्वाची भूमिका असेल.

आज महिला सर्व क्षेत्रात पुढे येत असताना, गांभीर्य व पावित्र्याने आपली जबाबदारी सांभाळत असताना त्यांना चांगले शिक्षण देण्याची एसएनडीटी विद्यापीठाची मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाला चंद्रपूर येथे केंद्र सुरू करण्यासाठी आणि पुणे परिसर (कँपस) विकासासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पालघर येथे विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशी सूचनादेखील श्री.पाटील यांनी केली.

कुलगुरू प्रा.चक्रदेव म्हणाल्या, न्यूयॉर्क येथील विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार असून विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना या विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी मिळेल. ‘चेतना’ केंद्राद्वारे विद्यार्थिनींना सर्व क्षेत्रात पुढे नेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. महिला सबलीकरणासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करण्यासोबत विद्यार्थिनींना सर्वांगीण विकासासाठी संधीदेखील उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

डॉ.मोरे यांनी विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘चेतना’ केंद्राविषयी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे हे केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थीनींसाठी सर्वस्पर्शी व आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.प्रभू तेंडुलकर यांनी प्रास्ताविकात युवा महोत्सवाची माहिती दिली. १९ कला प्रकारात ८०० ते ९०० विद्यार्थिनी सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री.पाटील यांच्या हस्ते विद्यापीठात कौशल्य विकसन अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘चेतना’ (सेंट्रल फॉर हॉलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नॉव्हल ॲडव्हान्समेंट केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमपूर्वी त्यांनी महर्षी कर्वे कुटीला भेट दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!