राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा : तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान

346 0

पुणे : देशभरात सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट पुणे आणि सेंटर फॉर अॅव्होकसी अँड रिसर्च संस्था (सिफार) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्र नोंदणी अभियान आणि ओळखपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात तृतीयपंथीयांना आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान कार्ड यासाठी आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त रविंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, पुणे मनपा उपायुक्त रंजना गगे, सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर आणि विविध तृतीयपंथी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तृतीयपंथी संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एकत्रित पुढाकारातून तृतीयपंथी व्यक्तींना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे श्री.पाटोळे यांनी यावेळी सांगितले.

शिबिरात २० तृतीयपंथी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, त्यातील १० व्यक्तींना तृतीयपंथी ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच २१ तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्रासाठी नाव नोंदणी केली आहे. आतापर्यंत समाज कल्याण पुणे कार्यालयामार्फत २८५ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व ओळखप्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. अधिकाधिक तृतीयपंथी व्यक्तींनी पुढाकार घेऊन ओळखपत्र मिळणेसाठी ऑनलाईनरित्या नोंदणी करावी असे आवाहन उपायुक्त श्री. पाटील यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!