महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या मार्च 2023 साठीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार असून बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
हे संभाव्य वेळापत्रक असून वेळापत्रकाबाबतची सविस्तर माहिती शाळांना दिली जाईल. कोरोना महामारीमुळे दोन वर्ष दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. आता कोरोनाचे सर्व निर्बंध संपुष्टात आल्यानंतर तसेच रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सर्व शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात आल्या आहेत.
2022 मध्ये ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. लिखाणाचा सराव कमी झालाय या कारणाने विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्यात आली होती. परंतु यावेळी विद्यार्थ्यांना वेळेसाठी कोणतीही सवलत मिळणार नाही.