पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा आता गुजरातमध्ये होणार आहे. यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरणात मोठी ढवळाढवळ झाली आहे. विरोधक शिंदे सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच शरद पवारांनी देखील थेट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन वेदांता प्रकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “वेदांता प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्यात मोदींनी मदत केली तर स्वागतच आहे. पण आता गुजरातला गेलेला हा प्रकल्प परत येणे शक्य नाही. वेदांता पेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगणं म्हणजे बालिशपणाचं …!”अस देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील शरद पवार यांनी सडेतोड टीका केली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, “केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे काही राज्यांसाठी अनुकूल असतात. त्यात जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी साहेब स्वतः तिथे आहेत. अमित शहा तिथे आहेत … त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. आणि थोडं लक्ष जर त्यांनी गुजरातकडे दिलं तर आपण समजू शकतो. तुम्ही जर मोदी साहेबांचे दौरे पहिले तर जास्तीत जास्त त्यांच्याच राज्यात ते जातात.. सहाजिकच आहे कुठल्याही माणसाला घरची ओढ जास्त असते. अशा भाषेत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.