महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार वर्षा अखेरीस !

507 0

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी भूमिका आज पत्रकार परिषदेत मांडली.

माजी खासदार श्री. अशोक अण्णा मोहोळ, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.

स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. त्याच आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे. ज्या मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा, उजाळा देणारी ही स्पर्धा ठरेल. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र स्विकारले आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वर्षाअखेरीस या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात येणार आहे, असेही मुद्दे यावेळी मांडले.

सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात जाणार आहेत. ३३ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील ४५ तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.

मामासाहेब मोहोळ यांच्या गावात मोहोळ कुटुंबीय ही स्पर्धा भरवत आहेत, ही आनंदाची बाब आह. तसेच गेली ३८ वर्षे ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा देण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. जो ‘महाराष्ट्र केसरी’ ठरतो, त्याच्या हातात मानाची गदा देताना समाधान वाटते, अशा शब्दांत यावेळी माजी खासदास श्री. अशोक अण्णा मोहोळ यांनी भावना व्यक्त केली. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. ९०० कुस्तीगीर, ९० व्यवस्थापक, ९० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री. विलास कथुरे यांनी दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!