चोरांचा राजा ‘चोर राजा’…कसा सापडला पोलिसांच्या जाळ्यात ? पाहा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट

438 0

पुणे : एक-दोन नव्हे तर तब्बल 100 हून अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात अट्टल घरफोड्या राजेश पपुल ऊर्फ ‘चोर राजा’च्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या चोर राजाकडून 42 तोळं सोने, 4 किलो चांदीचे दागिने, दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसं असा एकूण 24 लाख 64 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांची झोप उडवणारा कोण आहे चोर राजा ? पाहा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट चोरांचा राजा चोर राजा…

कुख्यात घरफोड्या राजेश पपुल ऊर्फ ‘चोर राजा’ याला पुणे पोलिसांनी अटक केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 100 हून अधिक गुन्ह्यांमध्ये पोलीस त्याच्या शोधात होते. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 नं कात्रज येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक केली. पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, यांच्या नेतृत्वाखालील आणि सहायक पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे यांचा समावेश असलेलं पथक शिवाय गजानन सोनुने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील मागील चार ते पाच महिन्यांपासून त्याच्या शोधात होते.

पुणे शहरात घरफोडी तसेच चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सूचना दिल्यानंतर पोलिस अंमलदार गजानन सोनुने यांनी कार्यवाही सुरू केली.

त्या दरम्यान, चोर राजा हा कात्रज येथील त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळताच युनिट-2 चे प्रभारी क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे तसेच युनिट-2 कडील पोलिस अंमलदार गजानन सोनुने, उज्ज्वल मोकाशी, कादिर शेख, संजय जाधव, उत्तम तारू, समीर पटेल, निखील जाधव, शंकर नेवसे, मोहसीन शेख, गणेश थोरात, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे यांनी 31 ऑगस्ट रोजी सच्चाई माता मंदिर, दुग्गड चाळ, कात्रज येथे तीन पथकं तयार केली आणि वेशांतर करून सापळा रचून चोर राजाला पकडलं.

या चोर राजानं मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील घरं फोडण्याचा आणि लुटण्याचा धडाकाच लावला होता म्हणून त्याला ‘चोर राजा’ या नावानं ओळखलं जाऊ लागलं. चोर राजा मोबाइल किंवा गॅझेट वापरत नसल्यानं त्याचा माग काढणं तसं अवघड होतं. त्यानं वयाच्या सातव्या वर्षापासूनच दरोडा घालायला सुरुवात केली होती. पोलीस गुन्हेगाराचा कसा माग काढतात, हे त्याला माहीत होतं. त्यामुळं त्यानं कधीही मोबाइल वापरला नाही आणि याच कारणामुळं त्याला अटक करायला पोलिसांना वेळ लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या एका नातेवाईकाच्या चपलांमध्ये जीपीएस मशीन बसवल्यानंतरच चोर राजाला पकडण्यात यश आलं. लॉकडाउन दरम्यान बहुतेक लोक घरातूनच काम करत असल्यानं राजाला घरफोडी करणं अवघड झालं होतं शिवाय अनेकांची सेव्हिंगही या काळात संपली होती मात्र सरकारनं निर्बंध उठवताच त्यानं पुन्हा घरफोड्या करण्यास सुरुवात केली.

या चोर राजाच्या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या पोलीस अंमलदार गजानन सोनुने यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काय माहिती दिली. पोलिसांनी राजाला ट्रॅक करण्यासाठी ‘चोर राजा’ नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. तिथं राजाशी संबंधित सर्व अपडेट्स पोस्ट केले जात होते. राजा आपल्याच घरी येत असल्याची खबर पोलीस हवालदार गजानन सोनुने यांना मिळाल्यानं पोलिसांनी सापळा रचून अखेर त्याला अटक केली. विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलिसांची डोकेदुखी ठरलेल्या या चोर राजाला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आली. 42 तोळं सोने, 4 किलो चांदीचे दागिने, दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसं असा एकूण 24 लाख 64 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!