पुणे : कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव मनासारखा साजरा करता आला नाही. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसताना पुणेकर गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहेत. अशातच आता लाडक्या गणरायाला उद्या निरोप देण्याचा दिवस आहे. त्यामुळे शहरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे.
उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मिरवणुका ठरलेल्या मार्गांवरून विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे डीजेचा दणदणाट आणि ढोल ताशाच्या निनादामध्ये लाडके गणराय निघणार आहेत. मात्र कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
ध्वनी प्रदूषणाची कोणाकडून तक्रार जर आली तर गुन्हे दाखल करू अशी रोखठोक भूमिका देखील पुणे पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.