Safe India Hero Plus Award : अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांचा मुंबईत सत्कार

443 0

मुंबई : आग असो वा आपत्ती अशावेळी कर्तव्य बजावत नागरिकांच्या जिविताची व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी चोख बजावणारे असे हे अग्निशमन दल. याचाच सन्मान म्हणून मुंबईच्या हॉटेल ताजमहाल याठिकाणी महाराष्ट्रातील विविध अग्निशमन अधिकारी व जवानांचा सेफ टेक या संस्थेकडून “सेफ इंडिया हिरो प्लस अवार्ड” देऊन सत्कार करण्यात आला. यामधे पुणे अग्निशमन दलाचे दोन अधिकारी एक वाहनचालक व चार फायरमन यांचा समावेश आहे.

काही दिवसापुर्वी पुण्यात खडकवासला धरणातून झालेल्या विसर्गाने नदीपाञात एक चारचाकी वाहन व पाच जण अडकलेले असताना एरंडवणा अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, वाहनचालक ज्ञानेश्वर खेडेकर व जवान किशोर बने, दिलीप घडशी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्यांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले तर कोंढवा अग्निशमन अधिकारी समीर शेख व जवान सोपान कांबळे यांनी एप्रिल महिन्यात पारगेनगर येथे एका गोडाउनला लागलेल्या भीषण आगीवर उत्तम कामगिरी केली त्याबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावून इतर यंञणेशी समन्वय साधत अभियांञिकी, विज्ञान, उद्योगधंदा प्रशासन, विधी अशा विविध स्तरांवर उच्चशिक्षण घेत दलाच्या जवानांची उत्कृष्ट कामगिरी प्रसिध्दी माध्यमातून जनमानसात पोहचविणारे फायरमन निलेश महाजन यांचा ही या कारणास्तव विशेष सन्मान करण्यात आला. अग्निशमन अधिकारी व जवानांच्या झालेल्या सन्मानाने दलाचे मुख्य अधिकारी गणेश सोनुने यांनी सर्वांचे कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!