पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा घोटाळा : पोलिसांकडून 6 रॅकेट उध्वस्त ; 56 आरोपींना ठोकल्या बेड्या… पाहा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 56 जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, वॉकीटॉकी संच, चार्जर आणि रोख रक्कम असा भलामोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नोव्हेंबर 2021 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 720 जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती झाली. ही प्रक्रिया जानेवारी 2022 पर्यंत सुरू होती. भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं आढळून आल्यानंतर याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चारकडून केला जातोय. तपासात पोलिसांनी पूर्वी 51 आरोपींना अटक केली होती. त्यातील 26 जण हे भरती प्रक्रियेतील उमेदवार होते. आणखी 75 पेक्षा अधिक जण या गुन्ह्यात आरोपी असून त्यांचा शोध सुरू आहे. एवढा घोटाळा करूनही या 75 आरोपींमधील 12 आरोपी भरती प्रक्रियेत नापास झाले आहेत.
गुन्हे शाखा युनिट चारच्या चार पथकांनी ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय 29, रा. जालना), कार्तिक ऊर्फ वाल्मिक सदाशिव जारवाल (वय 23, रा. औरंगाबाद), अरुण विक्रम पवार (वय 26, रा. बीड) अर्जुन विष्णू देवकाते (वय 28, रा. बीड), अमोल संभाजी पारेकर (वय 22, रा. बीड) यांना 22 ऑगस्ट रोजी अटक केली. त्यांच्याकडून 76 मोबाइल, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाइस, 22 वॉकीटॉकी संच, 11 वॉकीटॉकी चार्जर, 11 लाख रुपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला शिवाय हे डिव्हाइस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कपडे, सिमकार्ड्स, कागदपत्रे देखील पोलिसांनी जप्त केली. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्या या कारवाईत पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. आजपर्यंत बीड, औरंगाबाद, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर अशा विविध शहरांमधून 56 आरोपींना पिंपरी -चिंचवड पोलिसांनी अटक केलीये.
