सोलापुर : गणपती दूध पितो, देवीनं डोळे बंद केले, देवळातील नंदीनं दूध प्यायलं, हनुमानानं प्रसाद खाल्ला अशा बातम्या किंवा चर्चा आपण अनेकदा ऐकल्या असतील मात्र आता तर चक्क गणपती बाप्पा रडत असल्याचं सांगितलं जातंय. सोलापुरातील होटगी- कुंभारी रस्त्यावरील गणपती मंदिरातील बाप्पा रडतोय या बातमीनं मंदिर परिसरात एकच गर्दी उसळलीये हा नेमका काय प्रकार आहे पाहूयात…
या गणपती मंदिरात आज अचानक भाविकांची गर्दी का वाढली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचा शोध घेतल्यानंतर भुवया उंचावणारी बाब सर्वांसमोर आली. मंदिरातील गणपती रडत असल्याची माहिती एका भक्तानं दिली. याच कारणामुळं मंदिरात तोबा गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. गणपतीच्या डोळ्यांतील पाणी पाहण्यासाठी भाविक उत्सुकतेपोटी मंदिरात येत आहेत.
भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले आहेत मात्र ही निव्वळ अफवा असून या मागचं शास्त्रीय कारण काय त्याचा शोध घेतल्यानंतर हा नेमका काय प्रकार आहे हे कळून येईल, असं अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं परंतु अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतरही दर्शनासाठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय.