अर्थकारण : Salary Slip ‘नीट’ वाचलीत का ? अन्यथा…

338 0

अर्थकारण : नोकरदारांसाठी सॅलरी स्लिप ही अत्यंत महत्त्वाची असते. सॅलरी स्लिपमध्ये त्या नोकरदाराच्या उत्पन्नाविषयीची माहिती असतेच पण त्याशिवायही अन्य महत्त्वाची माहितीही त्यात नमूद केलेली असते. मात्र, बहुतांश नोकरदार सॅलरी स्लिपकडे लक्षच देत नाहीत. ते आपल्या खात्यात पगार जमा झाला आहे का ? हेच पाहात असतात.

वास्तविक, सॅलरी स्लिपमधील अनेक गोष्टी आपल्याला नोकरी बदलण्याच्या वेळेस आणि इन्क्रीमेंट मिळण्याच्या वेळी उपयोगी पडत असतात. जेव्हा दुसरी नोकरी शोधत असता, तेव्हा सॅलरी स्लिपची तुम्हाला नितांत आवश्यकता भासत असते. सॅलरी स्लिपमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या असतात, ते आपण पाहूया.

सॅलरी स्लिपमधील एक भाग तुमच्या हातात प्रत्यक्ष पडणार्‍या पगारा विषयी असतो, तर दुसरा भाग तुमच्या पगारातून किती रक्कम वेगवेगळ्या कारणासाठी कापली जाते या विषयीचा असतो. तुमच्या हातात येणारा पगार आणि पगारातून कापली जाणारी रक्कम मिळून कर्मचार्‍याचा सीटीसी (कॉस्ट टू कंपनी) तयार होतो. बेसिक सॅलरी हा आपल्या पगाराचा मुख्य भाग असतो. बेसिक सॅलरी एकूण पगाराच्या 35 ते 40 टक्के एवढी असते. बेसिक सॅलरी जेवढी जास्त तेवढा तुम्हाला आयकर अधिक द्यावा लागतो. बेसिक सॅलरी शंभरटक्के करपात्र असते.

पगाराच्या स्लिपमध्ये आपल्याला एचआरए या नावाने विशिष्ट रक्कम दरमहा दिली जाते. हा घरभाडे भत्ता बेसिक सॅलरीच्या 50 टक्के असतो. जर तुम्ही द्वितीय श्रेणीच्या किंवा तृतिय श्रेणीच्या शहरामध्ये राहात असाल तर बेसिक सॅलरीच्या 40 टक्के एवढा घरभाडे भत्ता दिला जातो.
त्याचबरोबर नोकरदारांना कंपनीकडून/संस्थेकडून कन्व्हेयन्स अलाऊन्स नावाने भत्ता दिला जातो. कर्मचार्‍याला कामानिमित्ताने बाहेरगावाला जाण्याची वेळ आली तर त्याला त्याही वेळी कन्व्हेअन्स अलाउन्स दिला जातो.

कन्व्हेअन्स अलाऊन्सची रक्कम कंपनी तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार निश्चित केली जाते. विक्री/मार्केटिंग विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कन्व्हेअन्स अलाउन्स अधिक प्रमाणात दिला जातो. प्रशासन, हिशोब या विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या तुलनेत विक्री विभागात काम करणार्‍या नोकरदारांना कन्व्हेअन्स अलाउन्स अधिक प्रमाणात दिला जातो. याचे कारण या विभागातील कर्मचार्‍यांना कामा निमित्त अनेकदा बाहेर हिंडावे लागते.

काही कंपन्या कर्मचार्‍यांना लिव्ह अ‍ॅण्ड ट्रॅव्हल (एलटीए) देत असतात. याचा अर्थ कर्मचारी सुट्टी काढून पर्यटनासाठी गेला तर त्याचा खर्च कंपनीकडून दिला जातो. त्यासाठी कर्मचार्‍याला प्रवासाची बिले कंपनीकडे सादर करावी लागतात.

याचबरोबर कर्मचार्‍यांना वैद्यकीय भत्ता (मेडिकल अलाउन्स) दिला जातो. अनेक ठिकाणी कर्मचार्‍यांना वैद्यकीय उपचारासाठी आलेला खर्च बिल सादर केल्यावर परत दिला जातो. काही कंपन्या हा भत्ता वार्षिक स्वरुपात तर काही कंपन्या दरमहा देत असतात. हा भत्ता पंधरा हजार रुपयांपर्यंत करमुक्त असतो.

काही कंपन्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामगिरीवर आधारित बोनस (परफॉर्मन्स बोनस) देत असतात. ही एक प्रकारे कंपनीकडून दिली जाणारी बक्षिसी असते. कर्मचार्‍यांनी अधिक चांगले काम करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन स्वरुपात त्यांना हा भत्ता दिला जातो. प्रत्येक कंपनीच्या हा बोनस देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. परफॉर्मन्स बोनसची रक्कम पूर्णतः करपात्र असते. हा भागही इनहँड सॅलरीमध्ये समविष्ट केला जातो.

सॅलरी स्लिपमध्ये दुसरा भाग असतो तुमच्या पगारातून कपात केल्या जाणार्‍या रकमेविषयीचा. पगारातून भविष्य निर्वाह निधी (पीएफ) च्या रूपाने विशिष्ट रक्कम दरमहा कापली जाते. साधारणपणे मूळ पगाराच्या (बेसिक सॅलरी) 12 टक्के एवढी रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी कापून घेतली जाते. तुमच्याकडून जेवढी रक्कम कापून घेतली जाते, तेवढीच रक्कम कंपनी तुमच्या नावाने भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करीत असते. आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होणार्‍या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते.

आपल्याला नवी नोकरी शोधताना सॅलरी स्लिप दाखवावी लागते. तुम्हाला नोकरी सोडत असताना त्या कंपनीत किती पगार होता याचा पुरावा म्हणून सॅलरी स्लिप ग्राह्य धरली जाते.

Share This News
error: Content is protected !!