पिंपरी – चिंचवड : नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीचं बनावट कॉल सेंटर तयार करून, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी – चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांनी गजाआड केलं.
बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीकडून हिंजवडी पोलिसांनी 7 अँड्रॉइड मोबाईल, 17 छोटे मोबाईल फोन, नोंदवह्या, रजिस्टर आणि कम्प्युटर असा एकूण 01 लाख 14 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. रफीउद्दीन ऊर्फ रफिक अब्दुल ललित चौधरी आणि मोहम्मद फिरोज हे दोन तरुण मुंबईच्या कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी पाडा झोपडपट्टीत झी 24×7 सेवन नावानं बनावट कस्टमर केअर सेंटर चालवत होते.
या कस्टमर केअर सेंटरच्या माध्यमातून ते नामांकित कंपनीचे फ्रिज, वॉशिंग मशीन आणि टिव्ही रिपेरिंग ऑर्डर स्वीकारत होते. झी 24×7 चे मेकॅनिक लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये थोडफार थातुरमातुर काम करून लोकांची फसवणूक करत होते. या प्रकरणात अरुण गुलाब डुंबरे या वाकडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं तक्रार केल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला. हा बनावट कॉल सेंटर चालवणारे रफीउद्दिन ऊर्फ रफिक अब्दुल ललित चौधरी, मोहम्मद फिरोज, अशोक धुकाराम माली, जयप्रकाश धुकाराम माली, पारसकुमार गौराराम माली या पाच आरोपींना हिंजवडी पोलिसांनी गजाआड केलं.