पुणे महापालिका पदभरतीसाठी घेण्यात येणारे परीक्षा शुल्क कमी करा – सुनील माने

114 0

पुणे : पुणे महापालिका पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे शुल्क कमी करून नोकरभरतीसाठी प्राप्त उमेदवारांना दिलासा द्यावा. असे निवेदन आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना आज दिले. याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सुनील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट -२ व गट -३ मधील रिक्त पदे सरळसेवा भरतीने भरण्यात येणार आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत वीस जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमार्फत गट २ मधील ४ पदे तर गट ३ मधील ४४४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दहा ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले आहेत. पद भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १००० रुपये तर मागसप्रवर्गाच्या उमेदवारासाठी ८०० रुपये ऑनलाईन पद्धतीने आदा करावे अशी जाहीरातीमध्ये सूचना देण्यात आली आहे.

या जाहिरातीला अनुसरून राज्य भरातून परीक्षेसाठी अर्ज येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेकांची एक हजार रुपये व आठशे रुपयांचे परीक्षा शुल्क भरणे कठीण जाणार आहे. तसेच पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवासखर्च ही सहन करावा लागणार आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन आपण या परीक्षेसाठी लागणारे परीक्षा शुल्क कमी करून ते दोनशे ते पाचशे रुपयांच्या आत करावे ही विनंती. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला भारतीय जनता पार्टी मार्फत आंदोलन करावे लागेल. असा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!