राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- डॉ.सुहासिनी घाणेकर

216 0

पुणे : राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी केले.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक मेटकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

डॉ.सुहासिनी घाणेकर म्हणाल्या, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, तसेच विविध आस्थापनांनी तंबाखू मुक्तीसाठी पुढाकार घ्यावा. तंबाखूमुक्त शालेय परिसर करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांच्या समन्वयातून तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती महत्वाची आहे.

सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने नियंत्रण कायद्याबाबत नियंत्रण कक्षाने याबाबत व्यापक जनजागृती करावी. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमाबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम सातत्याने करावेत. विविध कार्यशाळांचे आयोजन करावे, शालेय परिसरात या कायद्याबाबत अधिक कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही डॉ.घाणेकर यांनी दिल्या.

वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या आर्थिक वर्षात 41 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 2 हजार 177 नागरिकांचे तर 2022-23 मध्ये आतापर्यंत 21 प्रशिक्षण सत्रांद्वारे 1 हजार 514 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी पोलिसांनी 5 कोटी 43 लाखाहून अधिक रकमेचा गुटखा, 10 लाख 73 हजार रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले असून सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने 3 हजार 325 किलोग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

मराठवाडा ग्रामीण विकास महामंडळाच्या राज्य समन्वयक झिया शेख यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीपूर्वी पुणे शहर गुन्हे शाखेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना या कायद्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide