पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी झेडएस केअर्स तर्फे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संचलित स्टेम रोबोटिक्स लॅब

229 0

पुणे : रोबोटेक्स इंडिया स्वयंसेवी संस्था व रोटरी क्लब ऑफ पुणे-सिंहगड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्यावहिल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संचालित स्टेम रोबोटिक्स लॅबचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.

सर्वसामान्यांपर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI ), मशीन लर्निंग व स्टेम एज्युकेशन पोचावे याकरिता हि लॅब बांधण्यात येणार आहे.
लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे अद्ययावत ज्ञान आता विद्यार्थ्यांना मिळणार असून रोबोटेक्स नॅशनल व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी नव्या युगाचे तंत्रज्ञान व माहितीचा खजिनाच या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे.

या लॅबचे लाभार्थी असणाऱ्या तब्बल १५०० विद्यार्थ्यांना यावर्षीच्या झेडएस प्रस्तुत रोबोटेक्स नॅशनल या स्थानिक व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच या स्पर्धांतून विजयी झालेल्या स्पर्धकांना पुढे रोबोटिक्स आशिया व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी केले जाईल. याद्वारे भविष्यातील माहिती तंत्रज्ञान व त्यायोगे मिळणाऱ्या रोजगार संधींबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळेल.

तसेच रोबोटेक्स इंडिया च्या पायल राजपाल यांनी “समाजाच्या सर्व स्तरांत अद्ययावत तंत्रज्ञान पोहचवणे व मुलांना भविष्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. या स्टेम रोबोटिक्स लॅबमुळे आमच्या या ध्येयाप्रत पोहचण्यात आम्हाला निश्चित मदत मिळेल व भविष्यात या मुलांना मिळू घातलेल्या रोजगार संधींची ओळख त्यांना घडेल” असे म्हंटले.

“झेडएस या आमच्या कंपनीमार्फत समाजातील विविध स्तरांवरील संस्थांशी संलग्न होत अधिकाधिक जणांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख घडून भविष्यातील उज्वल संधींची कवाडे खुली होतील असा आम्हाला विश्वास वाटतो.” असे मत झेडएस च्या एचआर पार्टनर हर्षा पीटर यांनी व्यक्त केले.

तर झेडएस केअरच्या समन्वयक अनया पाटील म्हणाल्या, की “झेडएसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. अशातच रोबोटीक्स इंडिया व रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड पुणे यांच्या साथीने विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ करत नवनवीन माहितीचा खजिना व मार्गदर्शन देता येऊ शकणारा असा हा उपक्रम आहे.”

“बदलत्या विश्वाची हाक ऐकता मुलांना कोडिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक बनले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोबोटेक्स इंडिया यांच्यासोबत घडत असलेल्या या संयुक्त प्रकल्पातून अत्यंत प्रतिभावान असे भावी तंत्रज्ञ् आम्ही घडवू शकू असा विश्वास आम्हाला वाटतो” असे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यावेळी बोलताना म्हणाले.

तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग प्रत्येक सामान्यांपर्यंत पोहचवायचा असेल तर सध्याच्या व येणाऱ्या पिढ्यांना शालेय अभ्यासक्रमातूनच अद्ययावत अशा आर्टीफिशियल ईंटेलिजन्स व कोडींगचे ज्ञान देणे ही काळाची गरज आहे. आर्टीफिशियल ईंटेलिजन्स, मशिन लर्निंग व रोबोटीक्सच्या ज्ञानाच्या जोरावरच विविध संशोधनांना चालना मिळेल. प्रत्यक्ष जगातल्या शेतीविषयक, घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर अनेक सामाजिक समस्यांवर ठोस उपाययोजना शोधण्यासाठी व त्या अमलात आणण्यासाठी विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, कला तसेच तंत्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कोडींग व रोबोटीक्सचे पायाभूत ज्ञान अत्यावश्यक आहे.

Share This News
error: Content is protected !!