आरोग्य विशेष : पावसाळा म्हटलं की निसर्गाची तहान भागणार असते. उन्हाळ्यामुळे तापून निघालेली धरणी पावसाच्या आगमनाने शांत होते. सुरुवातीला कोसळणारा पाऊस सुखवून जातो. परंतु त्यानंतर या ऋतू सोबत येणारे आजार देखील त्रासदायक ठरतात. पावसाळ्यामध्ये लहान मुलांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती टिप्स आज आपण पाहूयात…
१. मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी मुलांना पावसात खेळण्यापासून रोखणे हा पर्याय नाही. त्यांना पावसात बागडू द्या. प्रत्येक गोष्टीवर योग्य वेळेचे नियंत्रण असेल तर पावसात खेळल्याने मुले आजारी पडणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे पावसाचे पाणी मुलांच्या शरीराला लागल्याने उन्हाळ्यातील उष्णता,घामोळ्या दूर होतात. परंतु ठराविक वेळेनंतर त्यांना पावसात खेळण्यापासून थांबवा.
२. मुलांचे शरीर कोरडे आणि उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी गरम कपडे त्यांना घाला,त्यासह सॉक्स देखील आवर्जून घाला.
३. कोणत्याही आजारपणाची लक्षणे दिसत नसताना कोणतेही औषध विनाकारण मुलांना देऊ नका.
४. पोळ्या झाल्यानंतर किंवा मुले घरात असतील तेव्हा तव्यावर ओवा,लवंगा टाका. त्याचा धूर घरभर पसरू द्या.
५. घरामध्ये ओल कमीत कमी राहील याची काळजी घ्या.
६. अन्नपदार्थ गरम करूनच खा. मुलांना कोणतेही पदार्थ देताना ताजे आणि गरम द्या.
७. पावसाळ्यात वातावरण थंड झाले आहे. जर बाळ ४-५ वर्षाच्या आत असेल तर नाचणी सत्व,अंडे उकडून देणे इत्यादी उष्ण प्रकृतीचे अन्न खायला घाला.
८ . ऋतुमान कोणतेही असो,सुकामेवा शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. मुलांना रात्री भिजवून बदाम मनुके खायला द्या. त्यासह अक्रोड,काजू,पिस्ता हे देखील मुलांचे शरीर आतून मजबूत बनवते.
लक्षात असू द्या मुलांना केवळ पाऊस पाण्यात किंवा थंडीमध्ये बाहेर जाण्यापासून रोखणे हा त्यांच्या आजारपणापासून रक्षण करण्याचा मार्ग नसून त्यांचे शरीर आतूनच निरोगी बनवण्याचा प्रयत्न करा.
