Breaking News

पंढरपूर:लाल मातीतील कुस्ती भारतीय संस्कृतीशी जुळलेली-पै.जगदीश कालीरमण

297 0

पंढरपूर :“रामायण आणि महाभारतात मल्ल या शब्दाचा उल्लेख सापडतो. त्यामुळेच लाल मातीतील कुस्ती ही भारतीय संस्कृतीशी जुळलेली आहे. बल आणि बुध्दीचा उपयोग कसा करावयाचा याचा प्रत्यय या खेळात पहावयास मिळतो.” असे विचार हिंद केसरी पै.जगदीश कालीरमण यांनी व्यक्त केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वाखरी,पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


कालीरमण म्हणाले कि,“ या देशाला कुस्तीमध्ये प्रथम पदक महाराष्ट्रातील मातीने मिळवून दिला आहे. त्यामुळे येथील वारकरी पैलवांनी कुस्तीला अशाच प्रकारे सहकार्य देत रहावे. पंढरपूर येथे दर वर्षी जवळपास ७ लाख वारकरी भक्त येतात. हा पालखी सोहळा मन आणि चित्त प्रसन्न करतो. त्यामुळे येथे येणार्‍या प्रत्येक भक्ताला तीर्थक्षेत्रात आल्याची अनुभूती मिळते.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,“मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे, असा वारकरी संप्रदाय हा जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. आज येथे भक्ती आणि शक्तीचा संगम दिसून येत आहे. नवी पिढी व्यसनाच्या आहारी जावू नये यासाठी कुस्ती भरविण्यात येते. राजबाग येथे उभारण्यात आलेल्या घुमटामुळे संत ज्ञानेश्वर आणि जगदगुरू तुकाराम महाराजांचे नाव संपूर्ण जगात पोहचले आहे. आज संपूर्ण जगातील नेत्यांचे लक्ष हे वारकरी संप्रदायाकडे आहे.”
पै. दिनानाथ सिंग म्हणाले,“ लाल मातीतील कुस्तीला जगविण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड हे अथक प्रयत्न करीत आहेत. ज्ञान सागराबरोबरच त्यांनी शक्तिची पुजा केली आहे. येथे आलेल्या वारकरी पैलवानांमुळे या लाल मातीची शोभा वाढली आहे.”
डॉ.एस.एन.पठाण म्हणाले,“ विश्वाच्या सुख, समाधान आणि शांतीसाठी जीवन व्यतीत करणारे डॉ. कराड यांनी वैष्णवांच्या मेळाव्यात कुस्तीचा आखाडा भरविला आहे. येथे भक्ती आणि शक्तीचा आदर्श उभा दिसतो. पायी वारी ही चित्तशुद्धीसाठी असते. त्यामुळे कर्म करतांना मनोभावे सेवा करावी. जो पर्यंत ही वारी चालेल तो पर्यंत वारकर्‍यांचा हा मेळावाही असाच भरेल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कथुरे यांनी केले. प्रा.डॉ. पी.जी धनवे यांनी कुस्ती स्पर्धाचे नियोजन केले.

Share This News
error: Content is protected !!