राजकारण

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांचे मानले आभार म्हणाले,”तुमचं माझ्यावर अजूनही प्रेम…!”वाचा नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे

मुंबई:शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.नुकतीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यासह देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.एकीकडे मंत्रिमंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना,माजी मुख्यमंत्री,शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले भावनिक आणि तितकेच परखड मत स्पष्टपणे मांडले आहे.या पत्रकार परिषदे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी चक्क बंडखोर आमदारांचेच आभार मानले आहेत.पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,“ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटते आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आदर वाटतो आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.”असे म्हणून त्यांनी हात जोडून बंडखोर आमदारांचे आभार मानले.

तसेच यावेळी त्यांनी परखडपणे या बंडखोर आमदारांना जाब देखील विचारला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,“जेव्हा माझ्या कुटुंबावर अश्लाघ्य भाषेत टीका केली जात होती,त्यावेळी एकही जण बोलला नाही. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“आज पर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलू लागले आहेत.ज्यांनी आजवर ठाकरे कुटुंबियांबाबत विकृत भाषेत टीका केली.त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात…मग तुमचं प्रेम खरं की खोटं! माझ्याबद्दल आजवर जे लोक जे बोलले ते तुम्हाला लखलाभ… असे म्हणून “धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही” असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.