मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेसाठी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या हलचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चेला उधाण आले असतानाच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येते आहे. मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणार आहेत की नाही,याविषयी कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे एकीकडे आश्चर्य व्यक्त होत असतानाच,दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 जुलै रोजी पंतप्रधान मोदी आणि इतर भाजप नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापन विषयी महत्त्वाची बैठक घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घडवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
