मुळशी तालुक्यातील दरडप्रवण घुटके गावातील 14 कुटुंबांचे स्थलांतर

210 0

पुणे:घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य दरड प्रवण क्षेत्रात समावेश असलेल्या मुळशी तालुक्यातील गुटके गावच्या १४ कुटुंबांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या निवासी पत्रा शेडच्या घरांमध्ये स्थलांतर केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या गावाला भेट देऊन कुटुंब आणि पशुधनाच्या स्थलांतरणाची पाहणी केली.

गतवर्षी पावसानंतर या ठिकाणच्या लोकवस्तीच्या वरील डोंगराच्या जमीनीला १ फुटाची भेग पडल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले होते. त्यानंतर भूवैज्ञानिकांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन पाहणी व अभ्यास केला. अभ्यासाअंती मूळ ठिकाणाहून जमीन सरकल्याचे आढळून आले. तसेच पावसादरम्यान या भेगेतून पावसाचे पाणी पाझरुन जमीनीखाली कठीण खडकाच्यावरुन आणि घरांच्या पायाखालून वाहत असल्याचेही निदर्शनास आले. ही बाब लोकवस्तीला धोकदायक असल्याने गतवर्षी तेथील कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभामंडपात स्थलांतरीत केले होते.

फियाट इंडिया प्रा. लि. च्या सहकार्याने प्रत्येकी २ खोल्यांची १६ पत्र्याच्या शेडची निवारा केंद्रे बनवण्यात आली असून त्यासाठी गावचे सरपंच श्रीराम वायकर यांनी जमीन दिली आहे. याव्यतिरिक्त पुणे जिल्हा परिषदेने या कुटुंबांच्या पशुधनासाठी गोठे बांधले आहेत.

जिल्हा परिषदेने या लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी ८ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना उभारली असून सौरदिवे तसेच अन्य मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या आहेत. गॅस सिलेंडर, शेगडीही देण्यात आली असून कोविड क्वारंटाईन केंद्रांमधील खाटा, तसेच न वापरलेल्या नवीन गाद्याही या प्रत्येक कुटुंबांना देण्यात आल्या आहेत.

गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी या पुनर्वसनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि सरपंच श्रीराम वायकर यांनी जमीन दिल्याबद्दल तसेच फियाट इंडियाचे राकेश बावेजा यांनी सामाजिक उत्तरदायित्व दाखवून या निवासी शेडच्या बांधकामाला निधी पुरवल्याबद्दल या कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!