यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष अत्याधुनिक सोयीसुविधा; महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

250 0

आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे आज १९ दुपारी १२.३० वा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते होत आहे.

रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला खासदार ॲड.वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता  चाकणकर यांनी ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाला, वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करणे, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देणे, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देणे यासोबतच महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करण्याबाबतही सूचित करण्यात आले होते.

या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने ‘आरोग्यवारी’ या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे, असे मत  चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

Share This News
error: Content is protected !!