नवी दिल्ली- हनुमान चालीसा विषयावरून गेल्या काही दिवसांपासून राणा दांपत्य चर्चेत आले आहे. आता नवनीत राणा यांच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याबाबतची तक्रार नवनीत राणा यांनी केली आहे.
नवनीत राणा यांनी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका मुस्लिम धर्मगुरूकडून फोन आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नवनीत राणा यांच्या फोनवर गेल्या दोन तीन दिवसात आठ ते नऊ वेळा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीनं त्याचं नाव कादरी असल्याचं सांगितल्याचा दावा राणा दांपत्याने केला आहे. सार्वजनिकपणे हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारु, अशी धमकी देण्यात आल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. नवनीत राणा यांनी त्या व्यक्तीने फोनवरुन शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी सुरु केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा नवनीत राणा यांनी केली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नाट्य रंगले होते. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. राणा दांपत्याला जेलची हवा देखील खावी लागली होती. जेलमधून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांनी थेट दिल्लीकडे तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही नवनीत राणा यांनी आपल्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता.