खाद्यतेलाचा विशेषकरुन तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेज तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतो. नवरात्रीच्या काळात आणि इतर सणाच्या काळात वातावरणात तेज तत्त्वाचे प्रमाण अधिक आढळते म्हणूनच तेज तत्त्वाचे तरंग, लहरी अखंड दिव्याकडे आकर्षित होतात. अखंड दीपामुळे या लहरी आपल्या घरात सतत प्रक्षेपित होतात. तसेच ब्रम्हांडात प्रक्षेपित झालेले शक्ती तत्त्व (आदिशक्तीचे तत्त्व) या दिव्याकडे खेचले जाते.
या कारणाने घरातील, मंदिरातील सात्त्विकता वाढते व अनिष्ट, नकारात्मक शक्तींचा नाश होतो म्हणूनच अखंड दीपाला नवरात्रीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीत तेज तत्त्वाचे/तेज लहरींचे आधिक्य वातावरणात असते, तेलाचा/तुपाचा दिवा तेज तत्त्वाचा प्रतिनिधित्त्व करत असल्याकारणाने या लहरी अखंड दीप ज्या घरात असेल तिकडे तेज तत्त्व सतत प्रक्षेपित करून वलय निर्माण करतात.
नंदादीप शक्यतो मातीच्या दिव्यामध्येच लावावा. कारण मातीच्या दिव्यात सात्त्विक तरंग प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. या नंदादीपामुळे घरातील नकारात्मक उर्जेचा नाश होतो व घरात चैतन्य, उल्हास निर्माण होऊन वातावरण प्रसन्न राहाते.
नंदादीप किंवा देवापुढे रोज लावला जाणारा दिवा हा खाद्यतेलाचा किंवा तुपाचा असावा. गाईचे तूप हे सर्वात जास्त सात्त्विक असते, तिळाचे तेल पण सात्त्विक असते. तेल रजोगुणी असते. यामध्ये गायीचे तूप सर्वात जास्त सात्त्विक व श्रेष्ठ असते. ज्यांना शक्य असेल त्यांनी तुपाचा दिवा नक्की लावावा. निदान तिळाच्या तेलाचा तरी लावावा. जर शक्यच नसेल तर साध्या खाद्यतेलाचा दिवा लावावा.
अखंड दीप हा धार्मिक पूजेचा एक भाग आहे. जर वारा, दिव्याची काजळी किंवा दिव्यातील तेल संपून गेल्या कारणाने दिवा विझला तर देवीची क्षमा मागून पुन्हा दीप प्रज्वलित करण्यास शास्त्रात कोणतीही आडकाठी नाही. या नंदादीपासमोर बसून देवी स्तुती, सार्थ दुर्गा सप्तशतीचे वाचन करणे, देवी नामजप करणे इष्ट मानले जाते.
दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रात कार्यरत असणाऱ्या तेजाधिष्ठीत लहरींच्या वेगात अखंडत्व व कार्यात सातत्य असल्याने या लहरी तेवढ्याच ताकदीने ग्रहण करणाऱ्या अखंड प्रज्वलित दीपरूपी माध्यमाचा उपयोग करून वास्तूत तेजाचे संवर्धन केले जाते.