मुंबई- देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. बेलापूर ते मुंबई अशी ही सेवा चालणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते. बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे.
विकासात दळणवळणाची सेवा महत्वाची असून नवी मुंबईला मुंबईशी जोडणारी ही जलवाहतूक सेवा सुरु होत आहे. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. समुद्राचा उपयोग फक्त सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी नाही. समुद्राचा उपयोग वाढला पाहिजे. आर्थिक विकासाची चळवळ गतिमान करताना जलवाहतूक असेल किंवा अन्य काही त्याचा उपयोग वाढला पाहिजे, असे सांगतानाच येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे खारे पाणी आपण गोड करत आहोत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटं तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
टॅक्सी भाडेदर
1) मुंबई डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते बेलापूर या वॉटर टॅक्सी सेवेचे एका फेरीचे एकेरी मार्ग भाडे १२१० रुपये असेल आणि तेवढेच भाडे परतीसाठी असेल.
2) डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते धरमतर या वॉटर टॅक्सी सेवेचे एका फेरीचे एकेरी मार्ग भाडे २ हजार रुपये असेल आणि तेवढेच भाडे परतीसाठी असेल.
3) डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या वॉटर टॅक्सी सेवेचे एका फेरीचे (एकेरी मार्ग) भाडे २०० रुपये असेल आणि तेवढेच भाडे परतीसाठी असेल.
4) डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते करंजा या वॉटर टॅक्सी सेवेचे एका फेरीचे (एकेरी मार्ग) भाडे १२०० रुपये असेल आणि तेवढेच भाडे परतीसाठी असेल.
5) डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते कान्होजी आंग्रे पुतळा या वॉटर टॅक्सी सेवेचे एका फेरीचे (एकेरी मार्ग) भाडे १५०० रुपये असेल आणि तेवढेच भाडे परतीसाठी असेल.
6) सीबीडी बेलापूर ते नेरुळ या वॉटर टॅक्सी सेवेचे एका फेरीचे (एकेरी मार्ग) भाडे ११०० रुपये असेल आणि तेवढेच भाडे परतीसाठी असेल.