इंदूर- एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात तरुणाने काळं फासलं. ही धक्कादायक घटना इंदूरमध्ये आज, मंगळवारी घडली. काळे फसल्यानंतर तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरला.
वारीस पठाण हे आज इंदूर येथील खजराना दर्ग्यात चादर चढविण्यासाठी गेले होते. वारीस पठाण यांच्या हस्ते खजराना दर्ग्यात चादर चढविण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह बघायला मिळाला. वारीस यांनी मनोभावनेने चादर चढवली. दर्ग्याच चादर चढविल्यानंतर वारीस पठाण बाहेर आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी वारीस यांच्याभोवती फोटो काढण्यासाठी घोळका केला. काहीजण फोटो काढण्यात व्यस्त होते. तर काहीजण वारीस यांना पुष्पगुच्छ देण्यात दंग होते.
या दरम्यान एक तरुण त्यांच्या पाठीमागून आला. त्याने वारीस यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं आणि तितक्याच वेगाने तो पळूनही गेला. या घटनेनंतर एमआयएमचे कार्यकर्ते घटनास्थळी आक्रमक झाले.