पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले. त्यानंतर हा भोंग्याचा वाद थांबताना दिसत नाही. मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी भोंगे न लावण्याची भूमिका घेतली. तर या मुद्द्यावरून मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी राजीनामाही दिला होता. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. ते म्हणतात की एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. पण जेव्हा एखादा शाखा अध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून सांगायला पाहिजे. तेव्हा आज शाखा अध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेते साईनाथ बाबर जनाधिकार शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी, उपशहराध्यक्ष आशिष देवधर, विभागाध्यक्ष गणेश भोकरे महिला विभागाध्यक्ष सौ.नीता पालवे उपशहराध्यक्ष अझहर सय्यद, एसटी कामगार शहर अध्यक्ष ललित तिंडे, महिला उपविभागाध्यक्ष नाझ इनामदार, शाखाध्यक्ष सलीम सय्यद, मोहसीन शिकालकार, विजय रजपूत, संग्राम तळेकर यांच्यासह भेटून आलो. पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव… जय मनसे…!
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/vasantmore88/posts/1064715440779386
काय म्हणाले होते राज ठाकरे ?
माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.