मुंबई- भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा उफाळून आली आहे. या संदर्भातील बातम्या प्रसारित झाल्या आहेत. त्यातच आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील गेले होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या वृत्ताचं खंडन केले असून दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचं म्हटलं आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या आहेत. माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
गेले काही दिवस महाविकास आघाडीतले अनेक नेते गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. संजय राऊत यांनी गृहखात्याने अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त करून गृहखात्यावर बोट ठेवलं आहे. संजय राऊत म्हणाले होते ‘तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.
राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं सेनेला मिळावं, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. गृहखातं भाजपबद्दल सॉफ्ट असल्यानं शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळाली होती. भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात गृहखातं कमी पडत असल्याची शिवसेनेची भावना आहे. प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं शिवसेनेची नाराजी असल्याचं बोललं जात होतं.
या सर्व पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर गृहखात्यावरून सुरू असलेल्या धुसफूशीवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या वृत्ताचं स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.