नागपूर : स्त्रीला कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते. मात्र आजच्या घडीला वृद्ध महिलांची अवस्था चिंताजनक आहे. म्हाताऱ्या आजींच्या छळामध्ये तब्बल 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये पोटच्या पोरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जनजागृती दिवसाच्या पूर्वसंध्येवर हेल्पेज इंडियाचा राष्ट्रीय स्तरावरील सर्व्हेक्षणावर हा अहवाल आहे. या अहवालानुसार ज्येष्ठ नागरिकांची विशेषतः वृद्ध महिलांची एकूणच स्थिती चिंताजनक आहे.
काय आहे या अहवालामध्ये ?
अलीकडच्या काळात शारीरिक महिलांवरील हिंसा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जवळपास 50 टक्के वृद्ध महिलांनी छळ अनुभवल्याचे, 46 टक्के जणींनी दर्जाहीन वागणूक मिळत असल्याचे आणि 40 टक्के जणींनी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे सांगितले. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे छळ करणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण सर्वाधिक 40 टक्के आहे. त्याखालोखाल इतर नातेवाईकांकडून 31 टक्के आणि सुनेकडून 27 टक्के अत्याचार करण्यात येत असल्याचे अहवालात समोर आले आहे.
अहवालातील काही ठळक मुद्दे
16 टक्क्यांनी वाढले म्हाताऱ्या आजींवरील अत्याचार
छळ करणाऱ्यांमध्ये मुले आघाडीवर
27 टक्के सुनांकडून सासूंचा छळ
40 टक्के जणींचा शारीरिक व मानसिक अत्याचार
56 टक्के म्हाताऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करीत नाहीत
78 टक्के वृद्ध स्त्रियांना सरकारी योजनांची माहिती नाही
66 टक्के वृद्ध महिलांकडे मालमत्ताच नाही
59 टक्के वृद्ध स्त्रियांकडे स्मार्टफोन्सदेखील नाहीत
48 टक्के वृद्ध स्त्रियांना किमान एकतरी गंभीर आजार
64 टक्के स्त्रियांचा आरोग्य विमाच नाही