‘मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार, पण…. ‘ उद्धव ठाकरे यांचे बंडखोरांना भावनिक आवाहन

284 0

मुंबई- बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मला कोणताही मोह नाही. असा भावनिक संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नि:क्षून सांगितलं.

गेल्या ४८ तासांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडावरही त्यांनी आपली भूमिका मांडली.

मुख्यमंत्री म्हणाले, “सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी उठलो असतो, जर त्यापैकी एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे. राजीनाम्याचं पत्र तयार करतो. आजच मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवतोय. मला कोणताही मोह नाही . फक्त माझ्या समोर येऊन बोला”

” मला दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं….? ज्यांना मी नकोय, त्यांनी समोर येऊन सांगावं.. आज संध्याकाळपासूनच मी मुक्काम वर्षाहून मातोश्रीवर हलवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!