उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी. या अटी शर्तींचे पालन करावे लागणार !

334 0

औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला कालपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. मात्र आज उद्धव ठाकरेंच्या या सभेला परवानगी मिळाली आहे. परवानगी देताना पोलिसांनी 16 अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत.

शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यासाठी गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र सभेला चार दिवस शिल्लक राहिले असताना पोलिसांची परवानगी मिळाली नसल्याचे मोठी चर्चा होत होती. अखेर पोलिसांनी 16 अटी आणि शर्ती टाकून परवानगी दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी ‘या’ अटी-शर्ती खालीलप्रमाणे

-जाहीर सभा ठरलेल्या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.

-कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येवू नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

-सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

-सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.

– कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये. तसेच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.

-सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.

-सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन ) प्रमाणे आवाजाची मर्यादा असावी

-कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील

संभाजीनगरची घोषणा होणार का ?

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत भाषण करताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. आपण स्वत: संभाजीनगर म्हणतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील काल शुक्रवारी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यात आले आहे. ही नावे कधीही घोषित केली जातील असे विधान केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत या संदर्भात अधिकृत घोषणा करणार का याची उत्सुकता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!