पिंपरी : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते सत्यच आहे. जगात अशी कोणतीच व्यक्ती नसेल जिला ही भावना समजू शकणार नाही. जिनी जन्म दिला, पालन पोषण करून मोठं केलं, प्रत्येक संकटात ढाल म्हणून उभी राहणारी आई अचानक जेव्हा काळाच्या पडद्याआड जाते. हे दुःख पचवणं कोणासाठीही कठीणच असतं. पिंपरीमधील राजू निकाळजे यांच्याबाबतही असंच घडलं .
राजू निकाळजे यांच्या आईचे निधन झाले. या गोष्टीचा त्यांच्या मनावर मोठा धक्का बसला. त्यानंतर अन्नपाणी सोडून स्वतःला त्यांनी खोलीमध्ये कोंडून ठेवलं. पंधरा दिवस अन्न पाणी न घेतल्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला. या घटनेची माहिती अग्निशमन दलास कळवण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने डोअर ब्रेकरच्या सहाय्याने दरवाजा उघडून या युवकाची सुटका केली आहे.
आईचे निधन झाल्यानंतर आठवणींमध्ये त्यांना भूक आणि तहान याचे देखील भान राहिले नाही. पंधरा दिवस शेजारचे सातत्याने त्यांना आवाज देत होते. घरातून ते प्रतिक्रिया देत होते. पण अशक्तपणामुळे ते दार उघडू शकत नव्हते. अखेर नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती कळवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.