जेजुरी : जेजुरी एमआयडीसीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील बर्जर पेंट्स या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरीतील एमआयडीसीत असणाऱ्या बर्जर पेंट्सच्या कंपनीमध्ये शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यानंतर कंपनी आणि परिसरामध्ये मोठा गोंधळ उडाला. स्फोटामध्ये जखमी झालेले कामगार रोहित माने हे सुमारे 90 टक्के भाजले, त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर रोहित माने या कामगाराच्या कुटुंबीयांनी कंपनीने मदत द्यावी म्हणून आंदोलन देखील केले आहे. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत रोहित माने यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.