मुंबई- केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. दहावी बारावीची परीक्षा सुरु आहे हे लक्षात ठेवा असेही राऊत यांनी म्हटले आहे.
भारत बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने आज सोमवारी 28 आणि उद्या मंगळवारी 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. घोषणेप्रमाणे हा संप सुरु देखील झाला आहे. यात प्रामुख्यानं विद्युत, बँकिंगसह अनेक केंद्रीय कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर होत आहे.
खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी देखील संपाची हाक दिली आहे. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, खासगीकरण कोणत्याही कंपनीचं होणार नाही, तसेच सरकारचा तसा अजिबात विचारही नाही अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. महावितरण आर्थिक संकटात असून कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा होऊन संप मागे घेतला जाईल. एक पाऊल सरकार मागे येईल, एक पाऊल कर्मचाऱ्यांनी मागे यावं, असं सांगत याविषयी तोडगा काढण्यासाठी उद्या संघटनांची बैठक देखील बोलावली आहे असे उर्जामंत्री म्हणाले.
राज्यात दहावी, बारावीची परीक्षा सुरू असून संपकऱ्यांना याची आठवण असावी. असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान संप कायम राहिल्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीवर परिणाम होणार असल्याचं राऊत म्हणाले. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, नितीन राऊत यांनी आवाहन केले आहे.
वीज कर्मचारी यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये. सध्या उष्णता वाढली आहे, विजेची मागणी ही वाढलेली आहे, शेतामध्ये व पीक असल्याने सिंचनाची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये आणि संप मागे घ्यावा अशी विनंती केली.
दोन अडीच दिवसांचाच कोळशाचा साठा
राज्यातील अनेक विद्युत केंद्रांना कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड्सचे युनियनही सामील आहे. यात खदानीमध्ये काम करणाऱ्यांपासून इतर अनेक हे दोन दिवस संपावर असणार आहेत आणि त्यामुळेच राज्यात अनेक ऊर्जा निर्मिती केंद्रांवर जिथे दोन अडीच दिवसांचाच कोळशाचा साठा आहे. तिथे वीज निर्मितीची परिस्थिती ही अटीतटीची होऊ शकते.