नवी दिल्ली- भारतातील अग्रगण्य वेदर फॉरकास्टिंग आणि अॅग्रीकल्चर रिस्क सोल्युशन कंपनी असलेल्या स्कायमेटनं 2022 या वर्षातील मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ टक्के कमी-अधिक होऊ शकतो.
स्कायमेटनं 21 फेब्रुवारी 2022 रोजी यावर्षीचा सर्वात पहिला मान्सून फॉरकास्ट जाहीर केला होता. आपल्या या पहिल्या प्राथमिक अंदाजावर ठाम राहत स्कायमेटनं यावर्षी मान्सून सामान्य असल्याचं म्हटलं आहे. या वर्षी एकूण 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.
साधारण जून महिन्यात भारतामध्ये मान्सूनचं आगमन होतं. भारतातील मान्सून पूर्णपणे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून हिमालयाकडे येणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असतो. जेव्हा हे वारे भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील पश्चिम घाटावर आदळतात तेव्हा भारत आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. संपूर्ण दक्षिण आशियात जून ते सप्टेंबर या काळात हे वारे सक्रिय असतात. या वाऱ्यांचा अभ्यास करून सरकारी आणि विविध खासगी कंपन्या मान्सूनचा अंदाज लावतात.
स्कायमेटचे सीईओ योगेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ‘गेल्या दोन पावसाळ्यांवर ला निना इव्हेंट्सचा (ला निना ही एक महासागरीय आणि वातावरणीय घटना आहे) परिणाम झाला होता. पूर्वी, ला निना हिवाळ्यात झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु, आता पूर्वेकडील वाऱ्यांच्या तीव्रतेमुळं त्याचं पुनरागमन थांबलं आहे. सध्या ला निना आपल्या सर्वोच्च स्थितीमध्ये पोहचलेलं आहे. तरी देखील नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी पॅसिफिक महासागर शांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सहसा मान्सूनवर परिणाम करणारं ला निनो यावर्षी अडथळा ठरणार नाही. पण, मान्सूनच्या वर्तनातील आकस्मिक बदलांमुळं दीर्घ ड्राय स्पेलनंतर मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.