नवी दिल्ली- दिल्ली येथे राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. स्वत: शरद पवार हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत. या बैठकीत शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच भाजपला रोखता येईल असं या बैठकीत म्हटलं आहे.
शरद पवार या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष रविकांत वर्पे उपस्थित आहेत. आता यूपीए अध्यक्ष बनवण्याच्या संदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर स्वत: शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठकही झाली होती. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत देखील हजर होते. त्यावेळी संजय राऊत आणि सोनिया गांधी यांच्यात युपीएत सामील होण्याबाबत चर्चा झाली होती.