मुंबई- शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत, असा दावा करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी हल्ला केला. दगडफेक आणि चप्पल फेक करुन आंदोलकांनी मोठा राडा घातला होता. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. विविध नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यासंदर्भात संजय राऊतांनी म्हटलं की, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे आहे, असे काही असे अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत व त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहेत.
असं आंदोलन आजवर कधीच महाराष्ट्रानं पाहिलेलं नाही. शरद पवार यांचा एसटी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. आंदोलनामागे ज्या काही अदृश्य शक्ती आहेत त्यांचा शोध लावला गेला पाहिजे. महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही अतृप्त आत्मा षडयंत्र रचत आहेत याची पाळंमुळं गृहमंत्र्यांनी शोधून काढली पाहिजेत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
सतीश उके यांना अटक केल्यानंतर या लोकांना आनंद होतो. मुंबईतील एक वकील सदावर्ते यांना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्रास होतो. दोघेही वकील, दोघांनाही समान न्याय पाहिजे. गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यातील लोक कोणी विधान परिषदेत आहेत, कोणी रस्त्यावर आहेत. ते महाविकास आघाडीतील माननीय पवार साहेबांवर टीका करतात आणि आम्हाला भाषा विचारतात. तर आमची भाषा अशीच असेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत आता शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’वर पोहोचले. काल झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. “पवारांच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? विरोधी पक्षाचा दळभद्रीपणाचा कळस आहे. सदावर्तेंना कुणाचा पाठिंबा आहे हे सर्वांना माहित आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठी सदावर्तेंना फंडिंग केलं जातं”, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.