पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले. पण पवार गणपती बाप्पाचं दर्शन न घेताच बाहेरुन मुखदर्शन घेऊन निघून गेले. त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहे. मात्र खरे कारण समजताच चर्चेला पूर्णविराम मिळाला.
शरद पवार आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन दर्शन घेतील, अशी बातमी समजल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले. कारण या मंदिराची स्थापना झाल्यापासून पवार एकदाही या मंदिरात दर्शनासाठी आलेले नाहीत. त्यामुळे शह्रद पवार दर्शनासाठी येणार म्हटल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.
शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते. मात्र आयत्यावेळी पवारांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेत बाहेरुन दर्शन घेणं पसंत केलं. आपण नॉनव्हेज खाल्लेले असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतल्याचं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या विषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मंदिराला आणखी नव्या जागेची आवश्यकता आहे. सदर जागा ही राज्याच्या गृह विभागाची आहे. मंदिराच्या व्यवस्थापनेच्या ट्रस्टचा मान राखून शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे भेटीसाठी येणार होते. त्यानुसार ते आले. आम्ही त्यांच्यासोबतच होतो. मंदिरात दर्शनाचा कोणता प्लॅन नव्हता. आम्ही जागेची पाहणी केली. कारण पुणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या आस्थेचं हे प्रतीक आहे. दगडूशेठ गणपतीवर अनेकजणांची श्रद्धा आहे. मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की, मला आणि पवारांना काही दोघं-तिघांनी दर्शन घेण्याबाबत विचारलं. पण पवारांनी आपण नॉनवेज खाल्लं असल्याने मी चुकीचा पायंडा पाडणार नाही. माझ्या बुद्धीला ते पटणार नाही. त्यामुळे मी बाहेरुनच दर्शन घेतो, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
या दरम्यान शरद पवारांनी आज पुण्यात भिडे वाड्याची पाहणी केली.