पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सावरकरांच्या साहित्याचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्या स्वाती जोगळेकर, प्राजक्ता प्रधान, आनंद काटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन १९०२ ते १९०५ या कालावधीत सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील इमारत क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये वास्तव्यास होते. महाविद्यालयाने याखोलीचे एका स्मारकामध्ये रुपांतर केले आहे. सावरकरांचा अर्धपुतळा, पदवी स्वीकारतानाचा अंगरखा, त्यांची काही प्रचित्रे, पुस्तके आदी स्वरुपात त्यांच्या स्ती जतन केल्या आहेत. सावरकरांचे वास्तव्याने पावन झालेली ही ऐतिहासिक खोली विद्यार्थ्यांचे प्रेरणा स्थान बनली आहे.