आता बोला ! एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे एकत्र मेजवानीत मस्त !

581 0

मुंबई – राजकारणात कुणीही कुणाचा मित्र नसतो तसेच शत्रू देखील नसतो. याचाच प्रत्यय देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत एकत्र दिसत आहेत.

हनुमान चालीसा पठणावरून राजकारण पेटल्याचे अलीकडेच महाराष्ट्राच्या जनतेने पहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे राणा दांपत्याने जाहीर करताच मोठे राजकीय वादळ रंगले. या प्रकरणावरून शिवसेनेच्या नेत्यांनी राणा दांपत्यावर टीकेचा भडीमार केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील शिवसेनेच्या नादाला लागाल तर 20 फूट खड्ड्यात पुरणार, अशी भाषा केली होती. राणा दांपत्याने देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्यावरून राणा दांपत्याला देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. हे सर्व प्रकरण ताजे असतानाच आज सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो पाहून महाराष्ट्राची जनता अचंबित झालेली असणार.

या फोटोमध्ये रवि राणा आणि संजय राऊत जेवण करत असून या दोघांमध्ये आणखी एक खासदार महोदय बसले आहेत. मात्र, दोघेही पुढे येऊन वाकून, एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. हा फोटो लेह येथील असून संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून हे सर्व लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते एकमेकांसमोर येणार का याची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच हा फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

लेह लडाखमध्ये परराष्ट्र व्यवहार समितीचा दौरा

परराष्ट्र व्यवहार समितीचा दौरा गेल्या चार दिवसांपासून लेह आणि लडाखमध्ये सुरू आहे. यात खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका सदस्याला घेऊन येण्याचीही मूभा असते. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा देखील आहे. देशातील एकूण ३० खासदारांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील फक्त तीन खासदार असून यात संजय राऊत, नवनीत राणा आणि प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!