नवी दिल्ली- कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई महापालिका निवडणूक जिंकू, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढवून जिंकून दाखवू असा दावा देखील राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुम्ही कितीही कारनामे करा. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र येऊ द्यात. आम्ही मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली उतरू देणार नाही. ही निवडणूक जिंकूच असा इशारा त्यांनी दिला. शिवाय ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढू आणि जिंकू असा दावाही त्यांनी केला.
एकीकडे भाजपने आमच्या मागे ईडी लावली, असा आरोप शिवसेनेतून केला जात आहे. तर दुसरीकडे तुमच्या कारनाम्यामुळे तुम्ही गोत्यात येताय, असा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, ” कोल्हापूर उत्तरमध्येच कशाला, तर गोव्यात, पाच राज्यांत, पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा. मात्र, अनेक गाठीभेटी होत असतात. आमच्याकडे अनेक लोक येतात. अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही”
‘आमच्याविरोधात कट कारस्थाने करणाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई महापालिका जिंकू. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला असला, तरी ईडी लावणे गरजेचे आहे. गोव्यातले पणजी मतदारसंघ आणि साखळी या दोन्ही मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावली तर त्याचेही स्वागत करू. महाराष्ट्रात नंतर बघू. सुरुवात पाच राज्यांतून करावी. चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतला, तर खांद्याला खांदा लावून काम करू, असेही संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हाच मोदींना पर्याय
शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत, आम्ही सर्वच त्यांचा आदर आणि सन्मान करतो. देशातील विरोधी पक्षांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत, यासाठी हालचाली सुरू आहेत आणि शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय या एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. पवार यांचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभत असतं. शरद पवार यांच्या प्रयत्नशिवाय मोदींना पर्याय आणि सक्षम विरोधी पक्ष तयार होऊ शकत नाही,हे माझं स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक मोठे नेते आणि ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी पुढे यावे, असे मत संजय राऊत यांनी मांडले.