महाविकास आघाडी आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभी- संजय राऊत

348 0

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. केंद्रातील भाजप सरकारने कितीही सूडाने कारवाई केली तरी आम्ही डगमगणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

अशा कारवायांमुळे भाजपच खड्ड्यात जाईल. महाराष्ट्रातील राजकारणाला इतके वाईट वळण कधी लागले नव्हते. तुमच्या हातात केंद्रीय तपासयंत्रणा आहेत म्हणून राज्यातील विरोधकांना नामोहरम करु, असे केंद्राला वाटत असेल तर तो समज चुकीचा आहे. शिवसेनेच मनोबल अशा कारवायांनी खच्ची होणार नाही. उलट अशा प्रत्येक कारवाईसोबत आमचे मनोबल वाढेल.

संजय राऊत म्हणाले, “अनिल परब आमचे सहकारी आहेत. राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. अनिल परब आणि आमच्या अन्य सहकाऱ्यांवर जे आरोप लावले जात आहेत, त्यापेक्षा गंभीर गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. अशा कारवायांमुळे सरकार पडणार नाही, तसेच सर्व निवडणुकाही सुरळीत पार पडतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

आमच्याकडेही भाजपच्या नेत्यांविरोधात असंख्य पुरावे आहेत. आम्ही लवकरच टॉयलेट घोटाळ्यासह अन्य घोटाळा बाहेर काढू, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!