राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात, आमदार जगताप सुखरूप

479 0

अहमदनगर – नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले.

मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यांचे काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला.

जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली. या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही.

अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. अपघतातून सुखरुप बचावल्यानंतर जगताप दुसऱ्या वाहनाने पुढे मुंबईला गेले. जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असंही जगताप यांनी म्हटले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!