महत्वाची बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला, पोलिसांच्या हातून निसटले

439 0

मुंबई- मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना दादर भागातून ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला. ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे पळून गेले. 

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. देशपांडे यांना पकडताना झालेल्या झटापटीमध्ये महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडली.

मशिदीवरील भोंगे हटवावे या मागणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य केले. त्यानंतरच्या उत्तरसभेत आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी ४ मे रोजी ज्याठिकाणचे लाऊडस्पीकर हटणार नाहीत तेथील मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला होता.

त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने तातडीची पावले उचलत मंगळवारी संध्याकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली.  राज्यभरामध्ये मनसे नेत्यांची कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!