मनसे नेते संदीप देशपांडे यांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरु

487 0

मुंबई- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अंगाशी आला आहे. पोलिसांनी आता संदीप देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविले नाही तर स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. यासाठी ४ मे ही अंतिम तारीख देण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्या या आदेशानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसैनिकांनी आंदोलन केली. या आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली दादर येथे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवास स्थानाजवळ मनसैनिक जमा झाले होते. राज ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती देण्यासाठी ते ‘शिवतीर्थ’ बाहेर आले.

माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. देशपांडे यांना पकडताना झालेल्या झटापटीमध्ये महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडली.

दरम्यान, पोलिसांनी संदीप देशपांडे यांना अटक करण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथेही क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी शोधाशोध केली.

Share This News
error: Content is protected !!