गुवाहाटी- शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटी येथे गेलेल्या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरत आहेत. आता शिवसेनेचाच एक पदाधिकारी थेट गुवाहाटी येथे पोहोचला असून एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर हातात फलक घेऊन उभा होता. त्याला असं पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 37 आमदारांना पुन्हा मुंबईत येण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि इतर अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र शिंदे गटाने त्याला प्रतिसाद दिला नाही.
बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत. या हॉटेलजवळ शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले पोहोचले होते. हातात फलक घेऊन ते बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचे आवाहन करताना आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.