मुंबई- सरकारकडून संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे. अशी माहिती खुद्द खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्र्यांच्या सोबत आज बैठक होणार आहे.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे ज्या 22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.
आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं. आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही. महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे म्हणाले की, यातून मार्ग निघाला पाहिजे. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण इथे आहोत. मी मराठ्यांचा सेवक, पण बहुजनांचं नेतृत्व करतो. आपण मार्ग काढून यावं अशी माझी विनंती आहे, असं ते म्हणाले.